Friday, March 24, 2017

एक काळा ठिपका..

🌑 एक काळा ठिपका 🌑
*******************
कॉलेजमधील एका प्राध्यापकाने एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले की., "आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे."
असे म्हणून प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती. कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले, "आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत."
***
मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्याचे लिहून झाल्यावर प्राध्यापकाने पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तर पत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौगोलिक रित्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा
वगैरे वगैरे !!!
सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले, "दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेला आहात."
सर्वजण दचकले. मग प्राध्यापक सांगू लागले.
"सर्वानी एकाच दिशेने विचार केला आहे. सर्वाचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्या भोवती खूप मोठा "पांढरा" पेपर आहे हे मात्र कुणीच लिहिले नाही आणि आपल्या जीवनात देखील असेच होते. आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो. ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्या कडे पाहतो. जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात. आपण त्यावर फोकस करतो आणि "खूप मोठा पांढरा" पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो. खरेतर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लीक्षित राहतो. म्हणून यापुढे एक लक्षात ठेवा. काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका !! खूप समाधानी व्हाल"
***

जगण्याचं सूत्र चुकतंय का?

' जगण्याचं सूत्र चुकतंय का? '

---------------

माणूस काही अहंकार सोडायला तयार नाही
जगण्याचं "सूत्र" चुकतंय पण खोडायला तयार नाही

भाऊ काय बहीण काय नुसता फापट पसारा
कोण कोणाला विचारतंय कुणालाही विचारा

कुणी कोणाकडे जाईना कुणी कुणाकडे येईना
जगलात काय मेलात काय माया कुणाला येईना

संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही
बैठकीत किंवा वसरीवर गप्पांची मैफिल बसत नाही

पॅकेज, इंक्रिमेंट, सॅलरी, इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड
यातच हल्ली माणसाचा होत आहे the end

Luxury मधे लोळताना फाटकं गाव नको वाटतं
जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं

उच्च शिक्षित असूनही माणूस आज mad वाटतं
इंटेरियर केलेल्या घरामध्ये लुगडं, धोतर odd वाटतं

सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे कसे काय posh असतील?
पार्लर मधून आणल्यासारखे चिकणे चोपडे ब्युटी दिसतील?

उन्हा तान्हात तळणारी माणसं काळी पडणारच
गरिबीनं गांजल्यावर चेहऱ्याचा रंग उडणारच

कुरूप ते नाहीत कुरूप तू झालास
प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलास

काळी असो गोरी असो माय ही माय असते
बाप स्वतःला गाडून घेतो म्हणून तुझी मजा असते

पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेचं मूळ विसरू नये
सुख असो वा दुःख असो आपल्या माणसाला विसरू नये

दिसण्यावर प्रेम करू नकोस आपलं समजून जवळ घे
एरव्ही नाही आलास तरी दिवाळीला तरी घरी ये

कंप्युटरच्या भाषा खूप शिकलास आपल्या माणसावर प्रेम करायचं शिक
नसता मानसिक आरोग्यासाठीvदारोदार मागत फिरशील भीक

दुसऱ्याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही
पॅकेज कितीही मोठं असू द्या जगण्यात मजा येणार नाही

जग जवळ करतांना आपली माणसं तोडू नका
अमृताच्या घड्याला अविचाराने लाथाडू नका.

Wednesday, March 15, 2017

तु खरच खुप खास आहेस

*तु खरच खुप खास आहेस..*
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील, तेव्हा कळेल..
तु खुप खास आहेस...
आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे..
मग प्रवासात कधी दरी,
कधी पर्वत..
कधी वादळ,
तर कधी वाळवंट आहे..
कधी ऊन,
तर कधी मुसळधार पाऊस आहे..
कधी गालिचे,
तर कधी काट्यांची फौज आहे..
पण नजर लक्ष्यावर असेल,
तर प्रवास हा एक मौज आहे..!
अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे..
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील..
तेव्हा कळेल,....
तु खरंच खुप खास आहेस..
वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे..
त्या सहन केल्यास तरच
तुझ एक ’अस्तित्त्व’ आहे..
पण जर हार मानुनि गेलीस..
तर मात्र पराभवाचे प्रभुत्त्व आहे..
प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर,
कधी शुभेच्छा,
तर कधी शिव्या-शाप आहे..
दुर्लक्ष केलस तर कळेल, तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे..!
काहीही झाले तरी डगमगु नकोस, तुझ्यात प्रचंड साहस आहे..
डोळे मिटुन स्वतःला शोधशील तर कळेल..
तु खरच खुप खास आहेस.

Wednesday, June 22, 2016

वाट पाहणारं दार - कविता

वाचनांत आलेली एक सुंदर कविता

"वाट पाहणारं दार"

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

खरच सांगतो त्या
दाराच नाव आई असतं।

उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

वाट पाहणाऱ्या या दाराला
आस्थेच महिरपी तोरण असतं।

घराच्या आदरातिथ्याच
ते एक परिमाण असतं।

नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड
मर्यादेचं त्याला भान असतं।

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

दारिद्र्याच्या दशावतारात
हे दार कधीच मोडत नसतं।

कोत्या विचारांच्या वाळवीनं
ते कधी सडत नसतं।

ऐश्वर्याच्या उन्मादात
ते कधी फुगत नसतं।

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

सुना नातवंडांच्या आगमनाला ते
तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं।

लेकीची पाठवणी करताना
अश्रूंना वाट करून देतं।

व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना
ते जरबेनं ताळ्यावर आणतं।

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

मित्रांनो,

उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा।

उपहासाची करवत
या दारावर कधी चालवू नका।

मानापमानाचे छिन्नी हातोडे
या दारावर कधी मारू नका।

स्वार्थी अपेक्षांचे खिळे
या दारावर कधी ठोकू नका।

घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला
कधीच मोडकळीला आणू नका।

कारण,

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

खरच सांगतो त्या
दाराचं नाव आई असतं।

उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।

प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

Thursday, April 09, 2015

तुम्हाला मराठीविषयी हि माहिती माहित आहे काय?

झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच 'मी माझी झाशी देणार नाही' असे म्हटले आहे.

रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडिओ केंद्रे आहेत.

हरियाणामध्ये १०.५ लाख मराठी लोक राहतात.

कराचीत (पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून तेथील विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

मराठीप्रमाणे अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.

मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.

महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांना गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतूनच समजून देण्यास सुरवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.

देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाट महाराष्ट्राचा आहे.

सांगली व कोल्हापूर मधील मराठी माणसाचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वाच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचा या व्यवसायात फार मोठा वाट आहे.

पूर्वी अफगाणिस्तान ते कन्याकुमारी व बडोदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेवा संबंध भारतात  मराठी भाषा प्रथम क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे.

मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर हि गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहचू शकेल.